वॉशिंग्टन : जोपर्यंत इथे नक्की काय चालले आहे, याची जाणीव झाली नाही, तोपर्यंत भारतीयांचा मी एक मोठा समर्थक होतो, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. यासोबतच डोनाल्ड ट्रम्प यांनी एक व्हिडिओचा संदर्भ दिला आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, अमेरिकेच्या काही भागांमध्ये, विशेषतः कॅलिफोर्नियाच्या तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरभरती प्रक्रियेवर भारतीयांचे वर्चस्व आहे.
तुम्ही भारत किंवा चीनमधील असणे आवश्यक आहे; कारण येथील जवळपास सर्व अंतर्गत यंत्रणा भारतीय आणि चिनी लोकांद्वारेच चालवल्या जातील, अशा प्रकारे त्यांची उभारणी करण्यात आली आहे. नोकर्यांसाठी श्वेतवर्णीय उमेदवारांनी अर्ज करण्याची आवश्यकता नाही, अंतर्गत भरती प्रक्रिया भारतीय व चीन लोकांद्वारे चालवल्या जातात, असा आरोप करण्यात आला आहे. हे दावे कोणत्याही पुराव्याशिवाय मांडण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे. तसेच ही बाब मला खात्रीशीरपणे माहिती आहे आणि यावर माझ्याशी कोणीही वाद घालण्याची काही गरज नाही, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
भारत, चीन यांसारख्या नरकसदृश अमेरिकेत येतात आणि...
स्थलांतरित लोक चीन, भारत किंवा या पृथ्वीवरील इतर कोणत्याही नरकसदृश ठिकाणांहून अमेरिकेत येतात; इथे मुले जन्माला घालतात, जी अमेरिकेचे नागरिक होतात, त्यानंतर ते चीन किंवा भारतातून आपल्या संपूर्ण कुटुंबाला येथे बोलावून घेतात, असे म्हणत ट्रम्प यांनी जन्मसिद्ध नागरिकत्व या मुद्द्यावर सुरू असलेल्या एका व्यापक चर्चेचा संदर्भ दिला. अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय आणि कायदेशीरदृष्ट्या चर्चेत आला आहे. सर्वोच्च न्यायालयात त्याच्या व्याप्तीवर सुनावणी सुरू आहो. या घटनांच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ही पोस्ट केली आहे. जन्मसिद्ध नागरिकत्वाबाबत येऊ घातलेल्या निकालाविषयी बोलताना ट्रम्प म्हणाले की, जर त्यांनी जन्मसिद्ध नागरिकत्वाच्या मुद्द्यावर आपल्या देशाच्या विरोधात निकाल दिला आणि तसे होण्याचीच शक्यता अधिक आहे, तर अमेरिकेला प्रचंड आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल; परंतु, त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, अमेरिकेला आपली प्रतिष्ठा गमवावी लागेल!
दरम्यान, या व्हिडिओमध्ये, विशेषतः भारतीय आणि भरती प्रक्रियेबाबतचे दावे, हे वादग्रस्त असून ते कोणत्याही सिद्ध पुराव्यांऐवजी केवळ राजकीय मतेच प्रतिबिंबित करतात, असे सांगितले जाते. अमेरिकेत आणि विशेषतः तंत्रज्ञान क्षेत्रात, भारतीय वंशाच्या कर्मचार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने, या विधानांमुळे भारतात नक्कीच लक्ष वेधले जाण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.